मी आणि माझं बालपण
बुधवार, १४ डिसेंबर १९८३… चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील शांत, हिरव्यागार मेहा गावी मी जन्मलो. माझ्या डोळ्यांनी पहिलं जगणं अनुभवलं ते एका साध्या, शेतकरी कुटुंबात. गावाभोवताल हिरवेगार जंगल, शेती आणि तिच्या मधोमध असलेलं आमचं गाव… आजही त्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत.
माझे वडील, सुरुवातीला एका बांधकाम ठेकेदाराकडे दिवाणजी म्हणून काम करायचे. त्यांची निष्ठा आणि कामावरील प्रेम वाखाणण्याजोगं होतं. आई… ती तर आमच्या घराचा आधारस्तंभ. शेतीत राबायची, घरातील सगळ्यांची काळजी घ्यायची. तिचा हात शेतात मातीकाम करताना कणखर झाला होता, पण तिचं मन तितकंच हळवं होतं. माझा मोठा भाऊ, माझ्यासाठी नेहमीच मित्र राहिला. आणि आजी… तिचे तर माझ्यावर विशेष प्रेम होते. तिच्या गोष्टी, तिचे अनुभव, तिचं प्रेम… आजही माझ्या मनात घर करून आहे.
आमचं घर कौलारू… पाठीमागच्या जुन्या घरात काका-काकू आणि त्यांची दोन मुलं राहायची. बरीच वर्षं आम्ही एकत्र, एकाच कुटुंबात राहिलो. त्यावेळची ती एकत्र कुटुंबाची ऊब आणि प्रेमळ नाती आजही आठवतात. घरी विजेची सोय नव्हती, त्यामुळे आमचं बालपण कंदीलाच्या मंद प्रकाशात आणि सायंकाळच्या फुलवात दिव्यांच्या उजेडात गेलं. त्या दिव्यांसाठी कापसाच्या वाती करण्याची ती लगबग… अंगणातील पवित्र तुलसी वृंदावनासमोर आणि देवघरात तेवणारा दिवा… त्या दिव्यांच्या प्रकाशात घर एका वेगळ्याच प्रसन्नतेने भरून जायचं.
मी जेव्हा चौथीत होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी किराणा दुकान सुरू केलं. तशी ती माझ्या आजीची खूप इच्छा होती. लहानपणापासून मी त्या दुकानात वडिलांना मदत करायचो. पुढे बरीच वर्षं ते दुकान मी स्वतः चालवलं. त्यातला प्रत्येक हिशोब, प्रत्येक ग्राहक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आमच्या कडे एक कॅरम बोर्ड होता. पाच रुपये प्रति गेम नुसार आम्ही तो खेळायला द्यायचो. नंतर माझ्या मोठ्या भावाने पूर्णवेळ लक्ष घातल्यावर मी पुढील शिक्षणासाठी शहरात गेलो.
माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला असला तरी, माझ्या आई-वडिलांनी मला चांगले संस्कार दिले. त्यांनी स्वतःच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला, पण कधीही हार मानली नाही. त्या संघर्षातूनच मला शिकण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. समाजातील गरीब आणि दुर्बळ घटकांच्या समस्या मी लहानपणापासून जवळून पाहिल्या. त्यांच्या दुःखात सहभागी झालो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.
याच तळमळीतून मी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. माझ्यासाठी हे केवळ एक काम नव्हतं, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी होती. अल्पावधीतच मी माझ्या कामाच्या जोरावर लोकांमध्ये ओळख मिळवली, लोकप्रियता मिळवली, ती केवळ माझ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे. देवनाथ गंडाटे… हे नाव एका साध्या आणि विनम्र व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक बनविलं. मी लोकांमध्ये सहजपणे मिसळतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि माझ्या लेखणीतून त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतो.
आज मागे वळून पाहताना, त्या मेहा गावच्या मातीच्या घरातून सुरू झालेला माझा प्रवास आठवतो. कंदीलाच्या प्रकाशात वाचलेली पुस्तकं, शेतातील कामांमध्ये आई-वडिलांना केलेली मदत आणि आजीच्या गोष्टींमधून मिळालेली शिकवण… या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनाचा पाया आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही, असामान्य स्वप्नं पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत मला माझ्या गुरुजन आणि कुटुंबासह मित्रांनी दिली. आणि म्हणूनच, आजही मी त्याच साधेपणाने आणि निष्ठेने माझ्या कामावर प्रेम करतो आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहतो. ही केवळ माझी आत्मकथा नाही, तर एका सामान्य माणसाच्या मोठ्या स्वप्नांची आणि त्या स्वप्नांना साकार करण्याच्या धडपडीची कहाणी आहे.
गावची शाळा आणि १४ किमी प्रवास
माझं गाव… घनदाट अरण्यात वसलेलं एक शांत ठिकाण. ‘मेहा बुजरुक’ हे माझ्या गावचं नाव. तशी याची काही खास ओळख नाही, ना इतिहासाच्या पानांवर नोंद. जेव्हा हे गाव वसलं, तेव्हा प्रशासकीय दप्तरात सहजपणे ‘मेहा’ असं नाव पडलं. एकाच नावाच्या दोन गावांसाठी मोठ्या गावाला ‘बुजरुक’ आणि लहान गावाला ‘खुर्द’ लावण्याची प्रथा, त्याप्रमाणे आमच्या गावाला ‘बुजरुक’ मिळालं. गावाला जायला तीन रस्ते आहेत आणि त्या तिन्ही रस्त्यांवर गर्द हिरवी वडाची झाडं दिमाखाने उभी होती. त्यांच्या पारंब्या वाऱ्याने हलत, दुरून एखाद्या नैसर्गिक तोरणासारख्या दिसत. जणू निसर्गानेच येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या स्वागतासाठी त्या कमानी उभारल्या होत्या. त्या वडाच्या झाडामुळेच माझ्या गावाची हवा, माती आणि मनंही समृद्ध झाली होती. लहानपणापासूनच वाघाच्या दहशतीची छाया आमच्या मनात घर करून राहिली होती. गावाच्या पश्चिमेला चार किलोमीटरवर असोला निळंशार पाण्याचं मेंढा तलाव. पूर्वेला सहा किलोमीटरवर वैनगंगा नदी खळखळ वाहते. तिच्या पलीकडे गडचिरोली शहर आधुनिकतेची स्वप्नं घेऊन उभं होतं.
गावात सातवीपर्यंत शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची एक छोटीशी प्राथमिक शाळा होती. पूर्वी ती कौलारू इमारत होती. लालसर कौलांमधून ऊन्हाचे सोनेरी किरण डोकावत आणि पावसाळ्यात टपटप आवाज करत. शाळेत दिडशे विद्यार्थ्यांसाठी जागा पुरेशी नसायची. त्यामुळे प्रार्थनेच्या वेळी पहिली ते तिसरीची छोटी मुलं ग्रामपंचायतच्या पडवीत बसत. त्या शाळेचे मुख्याध्यापक होते मुळे गुरुजी. त्यांचे ओठ नेहमी लाल असायचे, कारण त्यांच्या तोंडात सतत विड्याचं पान असे. ते दिसायला जरी थोडे कठोर असले तरी, त्यांच्या मनात विद्यार्थ्यांविषयी खूप प्रेमळ भावना होती. त्यांची शिस्त मात्र खूप कडक होती. पाढे चुकले की ते फड्यावर उभं करून हलकेच डोक्याला टकळी मारायचे आणि कधीकधी हातावरचा मार चांगलाच जाणवायचा. माझं पहिलं ते सातवीपर्यंतचं शिक्षण याच शाळेत झालं. तिसरीला असताना प्रभाकर पेटकर गुरुजी, चौथीला सवाईमुन गुरुजी आणि पाचवी ते सातवीला रजनी तरारे मॅडम, कालूराम चहांदे सर, तेजराज डोंगरे सर यांनी शिकविलं. सातवीची बोर्डाची परीक्षा झाली. गावापासून सातेक किमीवरील निमगाव येथे ही परीक्षा होती.
त्यापुढील शिक्षणासाठी १४ किमी अंतरावरील विहिरगावच्या विकास विद्यालयात नाव दाखल केलं. ती शाळा पंचक्रोशीत तिच्या शिस्तीसाठी खूप प्रसिद्ध होती. प्राचार्य नागपुरे सरांचा मोठा धाक होता. पण विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांना गावोगावी फिरावं लागायचं. काही शिक्षक आमच्या गावातही आले होते. वसतिगृहात प्रवेश आणि ॲडमिशन फी माफ, असं आकर्षक ‘गिफ्ट’ देऊन त्यांनी माझ्यासोबतच्या सातवी पास मुलांची शाळा सोडल्याची प्रमाणपत्रं (टीसी) घेऊन गेले. आमची नाव नोंदणी झाली. दहा-बारा मुलांपैकी फक्त पाच जणांना वसतिगृहात प्रवेश मिळाला. बाकीचे, माझ्यासोबतचे सगळे, रोज चौदा किलोमीटरचा सायकल प्रवास करू लागले. सकाळी दहा वाजता घरून निघायचं आणि सायंकाळपर्यंत घरी परत यायचं. आमच्यासोबत मोठ्या वर्गातील मुलं असल्यामुळे थोडा धीर यायचा.
बारसागडचा डोंगर, हिरव्यागार गर्द वनराईतून लाल मातीच्या वाटा आणि दोन मोठे नाले लागत. पावसाळ्यात तर त्या नाल्यांना अक्षरशः पूर यायचा. नाल्यांवर पूल नसल्यामुळे मोठी फजिती व्हायची. सायकल पाण्यातून वाहून जाण्याचा प्रसंग ओढवण्याची भीती नेहमी मनात घर करून राहायची. कॉलेजजवळच्या गेवरा गावात बुधवारी बाजार भरायचा. त्या दिवशी शाळेला दुपारनंतर सुट्टी मिळायची. बाजारात मित्रांसोबत गरमागरम जिलेबी खाण्याची मजा काही औरच होती. त्याच काळात गावात झुणका भाकर केंद्र सुरू झालं होतं. शनिवारी सकाळच्या शाळेनंतर दोन रुपयांत मिळणाऱ्या त्या झुणका भाकरीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते. गेवऱ्याच्या उदापुरेचा खारा चिवडा तर अख्ख्या परिसरात आवडीने खाल्ला जायचा. त्या छोट्याशा हॉटेलात नेहमी मोठी गर्दी असे.
पहिला वर्ष कसा बसा त्या मजेदार सायकल प्रवासात गेला. मात्र, रोज चौदा किलोमीटरचा प्रवास करून थकून गेलेल्या माझ्या वर्गमित्रांनी नववीत आमच्या गावाशेजारच्या अंतरगाव टोला येथील नवभारत विद्यालयात प्रवेश घेण्याचा विचार सुरू केला. त्या शाळेबद्दल मनात आधीपासूनच नकारात्मक भावना होती. पण सोबत कुणी नसल्यामुळे नाइलाजाने मलासुद्धा नवभारतमध्ये जावं लागलं. तिथे चिमूरकर नावाचे गणिताचे शिक्षक चांगले होते. तेवढे वगळता एकही शिक्षक नियमितपणे वर्गावर येत नसे. एक महिना उलटून गेला तरी शिकवणीचा पत्ताच नव्हता. एके दिवशी मी थेट मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि विचारणा केली. त्यांनी ‘आज होईल, उद्या होईल’ असं सांगून वेळ मारून नेली. तिथे जाऊन माझी चूक झाली, याचा मला खूप पश्चाताप झाला. पण, चांगली गोष्ट ही होती की आम्ही एकाही विद्यार्थ्याने विहीरगावच्या शाळेतून आमचं नाव कमी केलं नव्हतं. त्यामुळे परत जाण्याचा मार्ग अजूनही मोकळा होता. इतक्यातच विहीरगाव शाळेतील प्राचार्य नागपुरे सरांनी सर्वांना शाळेत परत येण्याचं सूचित केलं. आमच्या सगळ्यांच्या पालकांनी नागपुरे सरांची भेट घेतली आणि आम्हाला पुन्हा त्याच शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि खरं सांगायचं तर, बारावीपर्यंतचं माझं शिक्षण त्याच विद्यालयात झालं. त्या शाळेच्या प्रत्येक आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत. दुपारच्या सुटीत ४ रुपयांचा पारले बिस्कीट आणि चहा आजही आठवतो. कोल्हे सर, गराटे मॅडम, सेलोकर सर, शेंडे सर, धारणे सर, धानोरे सर, निखारे सर, खंडारे सर आजही आठवणीत आहेत. त्या कौलारू इमारतीची शांतता, शिक्षक- प्राध्यापकांची ची प्रेमळ कठोरता आणि मित्रांसोबतच्या सायकल प्रवासातील ती निरागस मजा… ते दिवस खरंच खूप सुंदर होते.
गावातील दंडार आणि शंकरपट
विदर्भाच्या झाडीपट्टीला एक खास सांस्कृतिक ओळख आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांतील समृद्ध जंगलांच्या दरम्यान उगम पावलेल्या या संस्कृतीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या प्रदेशातली रंगभूमी फुलली आहे झाडीपट्टी संस्कृतीमुळे, जी महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील लोकनाट्य आणि नृत्याचा अद्भुत मिलाफ आहे. झाडीपट्टी म्हणजे “दाट जंगल”, ज्यात भरपूर हसरे गाणी, धमाल नृत्य आणि नाट्यकार्यक्रमांचा सुरेख समावेश आहे. विशेषतः गोंड, माडिया आणि परधान जमातींच्या संस्कृतीशी हे चांगले जुळले आहे, ज्या भातशेती करत असताना त्यांच्या जीवनात विविध कलांचा अनुभव घेत आहेत. प्रत्येक भात रोवणी आणि कापणीच्या वेळी, निसर्गाच्या सान्निध्यात कडेकोट जंगलाच्या दरम्यान लोक लोकगाणी म्हणत. जात्यावर पीठ दळताना बाया ओव्या म्हणायच्या. गावात एकेकाळी पुराणकथा, नाट्य, नृत्य आणि संगीत नाटक, दंडार व्हायचे, जिथे पुरुषच महिलांची भूमिका साकारायचे. तेव्हा समृद्ध नाटकाची परंपरा उभी केली होती, परसराम दुरबुळे यांसारख्या कलाकारांनी, जे खूप वर्षे या लोककलेला जपून ठेवले. लहानपणी मला एका नाटकाचा भाग होण्याचा एक संस्मरणीय अनुभव आहे. त्या नाटकात संपूर्ण महिलांचा समावेश होता, आणि त्यात मी एकटा पुरुष बालकलावंत होतो. त्या नाटकात माझ्या भूमिकेतील संवाद त्यानंतर काहीच नसले तरी ते ५ मिनिटांचे प्रसंग मात्र एक आयुष्यभर लक्षात राहिले. एका अतुलनीय अनुभवातून मला नाटकाची खरी किंमत समजली, पण यानंतर कधीच नाटकाच्या क्षेत्रात ठामपणे प्रवेश केला नाही. गावातल्या पोस्टमास्तर वामनराव इलमलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाट्यप्रयोग होई. ग्रामीण रंगभूमीला एक नवा आकार देणारे असंख्य कलाकार, ज्यांनी आपल्या प्रतिभेने गावच्या सांस्कृतिक फुलांच्या गंधात रंग भरले. अरविंद निकुरे यांना नाटकाचे तितकेच प्रेम होते आणि त्यांच्या घरी नाटकाच्या तालिमी होत. रविंद्र भोयर यांच्या तबल्याच्या साथीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम एक नवा जीव घेत होते. गणपत कोलते आणि इतर कलाकारांच्या मदतीने, गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली. गावात दरवर्षी पुण्यतिथी महोत्सव साजरा होत असे, त्यात निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आणि लोककला सादरीकरणाच्या माध्यमातून माझ्या उत्साहाला एक नवा वळण मिळाला. अनेक वेळा प्रमाणपत्र मिळवून मी अधिक प्रोत्साहित झालो, परंतु भोयर यांच्या बदलीने त्या स्पर्धांना विराम लागला. वर्षातील सर्वात आनंदी दिवस म्हणजे शारदादेवीची पूजा आणि बैलाचे शंकरपट. शाळेला सुटी मिळायची. दिवसभर रंगत असलेल्या जत्रेत खेळणी, आकाशपाळणा, जिलेबी, बांगड्यांची दुकाने लागायची. रात्री रंगमंचावर नाटकाची धमाल सुरू व्हायची, जिथे पानठेले, नड्डे, चणे, चहा, पोहे अशा दुकाने होऊन आपलीच एक छोटीशी धम्माल जत्रा सुरू व्हायची. एकदा एका नाटकाच्या कार्यक्रमात एका सिनेमाच्या हिरोइनने येण्याचे ठरवले. प्रेमा किरण नावाची नटी आमच्या गावात आली होती. आमच्या नवीन घरात थांबली होती. तिथे प्रेमा किरणच्या आगमनामुळे मोठी गर्दी जमली. लावणीच्या नाटकांच्या वेड्या रसिकांचा तिथे अगदी रांग लागलेली होती. नाटकाचे अनेक प्रयोग आजही आठवतात.
काका आणि आत्याचं रेडिओ
लहानपणीच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. त्या आठवल्या की मन पुन्हा त्या काळात रमून जाते. माझ्या बालपणीचा एक खास मित्र होता—आमच्या घरचा जुना रेडिओ. तो माझ्या काकाने आणला होता. काळ्या रंगाचा आणि मोठ्या बटणांचा होता. त्यावर खूप सारे आकडे होते, आणि त्यावर मेगाहर्ट्झ लिहिलेलं असायचं. आम्ही तो हलक्या हाताने फिरवत असू आणि एका विशिष्ट संकेतानंतर लालसर पट्टी एका ठिकाणी थांबायची.
माझे काका शिवणकाम करायचे. शिलाई मशीनच्या पैडलचा आवाज आणि रेडिओवरील गाणी यांचा एक वेगळाच संगम घरात घुमत राहायचा. काका गाणी गुणगुणायचे, मशीनच्या ठेक्यावर ती लयीत मिसळायची. भिंतीला एक खुंटी होती, त्यावर तो रेडिओ लटकवलेला असायचा. सकाळी तो सुरू झाला की, जणू घराला एक वेगळीच ऊर्जाच मिळायची. दररोज पहाटे रेडिओ सुरू केला की त्यातून एक सुरेल धून यायची. मग लगेच उद्घोषकाचा आवाज – “नमस्कार! हे आकाशवाणीचे केंद्र आहे. सकाळचे… वाजलेत. आपण ऐकत आहात…” ह्या आवाजाने दिवसाची सुरुवात व्हायची. शेतामध्ये रात्री मचानावर बसलेले शेतकरी, बैल गाडीतून लांब प्रवास करणारे गुराखी, आणि अभ्यास करणारे विद्यार्थी—सर्वांच्या सोबतीला हा रेडिओ असायचा.
त्या काळात आमच्या घरी एक नवाच रेडिओ आला. तो आमच्या आत्याकडून सेकंड हँड घेतलेला होता, पण अगदी नवीन वाटायचा. त्याला एक मोठा अँटेना होता आणि आवाजदेखील स्वच्छ यायचा. एफएम पद्धत सुरू झाल्यावर रेडिओ ऐकण्याचा आनंद अधिकच वाढला. जुन्या भावगीतांपासून ते नवे चित्रपटगीतांपर्यंत सगळं काही त्यावर ऐकायला मिळायचं. “भूले बिसरे गीत,” “संगीत सरिता,” “हवा महल,” “जयमाला” हे कार्यक्रम मनात अजूनही ताजे आहेत.
नागपूर आकाशवाणीच्या ‘अ’ केंद्रावरून आमच्या आवडत्या गाण्यांची फर्माईश पत्राद्वारे पाठवता यायची. मीही एकदा पत्र पाठवून माझ्या आवडीचं गाणं ऐकण्याचा आनंद घेतला होता. पुढे चंद्रपूर एफएम केंद्र सुरू झालं, तेव्हा फोन करून गाण्यांची फर्माईश करण्याचा वेगळाच आनंद मिळाला. रेडिओशी माझं नातं एवढ्यावरच थांबलं नाही. पुढे मला चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावर दोनदा मुलाखत देण्याची संधी मिळाली. तेव्हा प्रथमच आकाशवाणी केंद्र कसं असतं, तिथे प्रसारण कसं होतं, रेकॉर्डिंग कसं केलं जातं हे प्रत्यक्ष पाहता आलं.
पण काळ बदलला… पुढे घरी नवीन एफएम रेडिओ आला. मग टेपरेकॉर्डर, टीव्ही, मोबाईल… आणि हळूहळू तो जुना मित्र एका कोपऱ्यात गेला. एक दिवस अचानक त्या रेडिओचा आवाज बंद झाला. त्याचं बटण फिरवलं, पण लालसर पट्टी हललीच नाही. काही वेळाने कळलं, तो आता कायमचा बंद झाला आहे. आजही रेडिओचा तो आवाज मनात जिवंत आहे. जरी हातात रेडिओ नसला, तरी मोबाईलमधून तेच गाणं, तोच आवाज पुन्हा ऐकायला मिळतो. पण तरीही जुन्या रेडिओच्या त्या सुरेल आठवणी मनात कायम घर करून बसलेल्या आहेत… ये कहां आ गये हम यूँ ही साथ साथ चलते….
आयुष्याला नवी दिशा
सन २००१… मी अकरावीत होतो आणि माझ्या तरुण मनात ज्ञानाची नवी क्षितिजं गवसणी घालण्याची ओढ होती. त्याच सुमारास ‘लोकमत युवा मंच’तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. माझ्या तालुक्यात, सावली येथे या स्पर्धेचं केंद्र होतं. त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझं नाव नोंदवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मला तब्बल १६ किलोमीटरचा सायकल प्रवास करून व्याहाड हे गाव गाठावं लागलं.
व्याहाडला पोहोचल्यावर, पवार शाळेत माझी भेट झाली जाक्कुलवार सरांशी. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आपुलकी आणि शिक्षकी वत्सलता होती. मी त्यांना स्पर्धेत नाव नोंदवण्यामागचं कारण सांगितलं आणि त्यांनी लगेच माझी नोंदणी करून घेतली. पण माझ्या मनात एक प्रश्न होता… या स्पर्धेसाठी मला योग्य मार्गदर्शन कोण करेल? माझी ही द्विधा मनःस्थिती सरांनी ओळखली असावी. त्यांनी मला तिथल्याच प्रवीणभाऊ आडेपवार विद्यालयातील लिपिक रवींद्र कुडकावार यांचं नाव सुचवलं. आज ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक आहेत, हे आठवूनही मला आनंद होतो.
दुसऱ्या दिवशी, मी निफंद्रा गावी रवींद्र कुडकावार सरांना भेटायला गेलो. मनात थोडी भीती आणि खूप सारी उत्सुकता होती. त्यांना भेटल्यावर मी माझ्या येण्याचं कारण सांगितलं. त्यांनी मला पाच-सहा दिवस सामान्य ज्ञान स्पर्धेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची कल्पना दिली. त्यांची ती समजावून सांगण्याची पद्धत खूप छान होती. त्या भेटीतच त्यांच्यातील ज्ञानाची आणि अनुभवाची श्रीमंती मला जाणवली.
स्पर्धा संपली… निकाल लागला… पण रवींद्र सरांशी असलेली माझी भेट आणि बोलणं थांबलं नाही. हळूहळू आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्या एका औपचारिक परिचयातून एका घट्ट मैत्रीत रूपांतर झाल्या. २००१ मध्ये रवींद्र सर ‘लोकमत’साठी वार्ताहर म्हणून लिहायचे. त्यांच्यातील बातमीदारीची ती धमक मला खूप आकर्षित करायची. मी त्यांना माझ्या गावाकडच्या छोट्या-मोठ्या घटना सांगायचो. माझ्या साध्याभोळ्या माहितीला ते बातमीचं रूप देऊन वृत्तपत्रात छापून आणायचे. आणि मग सुरू झाला माझा बातमी आणि वृत्तपत्रांशी एक अनोखा संबंध. माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या घटना, माझ्या कानांनी ऐकलेल्या गोष्टी जेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून यायच्या, तेव्हा मला एक वेगळाच आनंद आणि उत्साह मिळायचा.
बारावीत असताना रवींद्र सरांनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. केवळ स्पर्धेपुरतंच नव्हे, तर माझ्या पुढील शिक्षणासाठी आणि आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांसाठीही त्यांचा सल्ला माझ्यासाठी मोलाचा ठरला. याच काळात माझ्या गावी के. आर. चहांदे नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी मला पाचवी ते सातवीपर्यंत शिकवलं होतं. माझ्या बालपणीच्या त्या शिक्षकांनीही मी बारावीत असताना माझ्या अभ्यासात खूप मदत केली. त्या दोघांनाही माझ्याविषयी एक खास आपुलकी होती. त्यांच्या त्या निःस्वार्थ प्रेमामुळे आणि मार्गदर्शनामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो, याची जाणीव मला आजही आहे.
ती सामान्य ज्ञान स्पर्धेच्या निमित्ताने झालेली ती पहिली भेट… व्याहाडच्या शाळेत जाक्कुलवार सरांनी दाखवलेली आपुलकी आणि रवींद्र सरांशी झालेली मैत्री… या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे ठरल्या. एका स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास, एका निष्ठावान मित्राच्या आणि मार्गदर्शकाच्या रूपात माझ्यासोबत कायम राहिला. आणि त्याच भेटीतून माझ्या मनात बातमीदारीची एक छोटीशी पण चिरस्थायी ज्योत पेटली, ज्याने माझ्या पुढील आयुष्याला एक नवी दिशा दिली.
सामाजिक परिणाम
माझ्या गावात आनंदराव येडेवार यांचं निधन झालं. ते वयोवृद्ध होते आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला केस कर्तनाचा त्यांचा व्यवसाय होता. गावात सगळे त्यांना ‘माली’ याच नावानं ओळखायचे. माझ्या बालपणी माझी पहिली हजामत त्यांच्या कैचीखालीच झाली होती. त्यांच्या हाताचा तो स्पर्श आणि त्यांच्या गप्पा आजही आठवतात. त्यांची दोन्ही मुलं शिकून मोठी झाली होती आणि गोंदिया जिल्ह्यात चांगल्या नोकरीला लागली होती.
आनंदराव माल्याच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावात हळूहळू शोक दाटून आला, पण खरी चर्चा रंगली ती त्यांच्या मुलांविषयी. शिकलेल्या या मुलांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढ असलेल्या पारंपरिकतेला साफ झुगारून देत वेगळ्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केले. गावात या गोष्टीची उलटसुलट चर्चा सुरू झाली. “या पोरांनी काय केलं हे?”, “जास्त शिकलेल्या माणसांनाच हे असले शहाणपण सुचतं”, अशा सुरात काही लोक बोलत होते, तर काहीजण त्यांच्या धाडसाचं कौतुक करत होते. त्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या पार्थिवाला स्मशानभूमीऐवजी थेट आपल्याच शेताच्या एका शांत कोपऱ्यात माती दिली होती. गुरुदास, जे पशुवैद्यकीय डॉक्टर होते आणि विनायक, शिक्षक होते, या दोन्ही भावांनी केशवपन (डोक्यावरचे केस न काढणे) केलं नव्हतं. अंत्यविधीत काकस्पर्शासारखे क्लिष्ट विधी असोत किंवा श्राद्धासारखे धार्मिक कर्मकांड, त्यांनी काहीच केलं नाही. उलट, या सगळ्या खर्चाच्या बदल्यात त्यांनी आपल्या गावच्या शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्याची उदात्त घोषणा केली.
या अनोख्या अंत्यविधीची चर्चा जशी गावभर पसरली होती, तशीच ती आमच्या घरीही रंगली. चूक की बरोबर, यावर घरात मतमतांतरं सुरू होती. तेव्हा मी १८ वर्षांचा असेल. घरात मोठ्यांच्या मध्ये बोलण्याची हिंमत होत नव्हती, पण त्या मुलांच्या कृतीमुळे माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. रात्र हळू हळू ओसरली आणि दुसरा दिवस उजाडला. सकाळी मला गुरुदास येडेवार यांनी त्यांच्या बहिणीच्या (विमल वामनराव इलमलवार) घरी बोलावलं. कुणीतरी त्यांना सांगितलं होतं की मी एका वार्ताहराच्या मार्फत बातम्या देतो. त्यांनी मला काल झालेल्या अंत्यविधीबद्दल माझं मत विचारलं. मी काहीच बोललो नाही. कारण त्यांनी जे केलं होतं, ते करायला खूप मोठं धाडस लागतं आणि ते बघून मी खरंच खूप भारावलो होतो. “या अंत्यविधीची बातमी छापून येईल का?”, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. “पाठवून बघू”, असं मी त्यांना सांगितलं. कारण खरं सांगायचं तर, मी अजून कुण्या वृत्तपत्राचा अधिकृत वार्ताहर नव्हतो.
येडेवार यांनीच ती माहिती स्वतःच्या शब्दांत लिहिली आणि कुडकावार सरांच्या मार्फत ती बातमी ‘लोकमत’च्या चंद्रपूर कार्यालयात पाठवली. तेव्हा गजानन जानभोर हे जिल्ह्याचे प्रतिनिधी होते. पुढे ते नागपूर लोकमतमध्ये संपादक झालेत. आणि आश्चर्य म्हणजे, पाच दिवसांनी ती बातमी वृत्तपत्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रकाशित झाली! त्या दिवशी मला खरं कळलं की एका साध्या बातमीचं महत्त्व काय असू शकतं.
आनंदराव माल्याच्या निधनाची ती घटना आणि त्यांच्या मुलांनी घेतलेला तो धाडसी निर्णय… त्याने केवळ एका गावाची विचारसरणी बदलली नाही, तर माझ्या आयुष्यालाही एक नवी दिशा दिली. त्या अंत्यविधीच्या बातमीने माझ्यातील बातमीदाराला जन्म दिला, एका सामान्य घटनेतून असामान्य गोष्टी शोधण्याची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा दिली. ती बातमी माझ्या पत्रकारितेच्या प्रवासाची पहिली पायरी ठरली. त्या बातमीमुळे नकळतपणे मीदेखील लिहिता झालो. जुनी वृत्तपत्रं शोधू लागलो, रद्दीत पडलेल्या बातम्या वाचून काढू लागलो आणि कोणती बातमी कशी लिहिली जाते, याचा सराव करू लागलो.
पत्रकारितेचा प्रवास
बारावीची परीक्षा संपली आणि माझ्या तरुण स्वप्नांना पंख फुटले. शिक्षणासाठी चंद्रपूर शहराकडे प्रस्थान केलं. गावातला मित्र, दिवाकर कोलते, सोबत होताच. एका भाड्याच्या खोलीत आम्ही दोघे रूममेट म्हणून राहू लागलो. सरदार पटेल महाविद्यालयात बी.ए.ला ॲडमिशन घेतलं. माझा जीव रमत होता भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये. जगाचा नकाशा आणि राजकारणाची गुंतागुंत मला नेहमीच आकर्षित करायची. भारताचा नकाशा मी डोळेमिटून अचूक काढायचो. राज्य आणि त्याच्या राजधानी तोंडपाठ होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. भूगोल घेण्यासाठी शुल्क जास्त होतं आणि माझ्या खिशात होते फक्त पाचशे रुपये. आणखी तीनशे रुपये कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न होता. त्यात इतर खर्चही होतेच. नाइलाजाने मला माझ्या आवडीच्या भूगोलाला सोडावं लागलं आणि मी मराठी वाङ्मय निवडलं. शब्दांची दुनियाही मला तितकीच मोहक वाटत होती.
सकाळच्या वेळेत कॉलेज असायचं आणि घरखर्चासाठी काहीतरी काम करणं गरजेचं होतं. पूर्वी एसटीडी बूथवर नोकरी मिळायची. जिथे लोक दूरचे नंबर लावण्यासाठी गर्दी करायचे. पण त्याच काळात शहरात कॉइन बॉक्सवाले फोन सुरू झाले आणि एसटीडी केंद्रांचं महत्त्व कमी होऊ लागलं. झेरॉक्सच्या दुकानांमध्येही फार संधी दिसत नव्हती. अखेर मित्रांच्या मदतीने एका स्टेशनरीच्या दुकानात महिन्याला पाचशे रुपये पगारावर काम मिळालं. त्यात दीडशे रुपये रूमभाडं आणि इतर छोटा-मोठा खर्च भागत होता. सोबत माझी सायकल होती, जी शहरात फिरण्यासाठी खूप उपयोगी पडायची. असे सहा महिने कसेबसे काढले. पण त्या धावपळीतही माझा वृत्तपत्रं वाचण्याचा छंद काही सुटला नव्हता.
आणि याच काळात माझी ओळख झाली ‘लोकमत युवा मंच’शी. तिथे आनंद आंबेकर आणि नंदू परसावार भेटले. त्यांच्यातील उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहून मी खूप प्रभावित झालो. त्यांनी मला या क्षेत्रात आणखी पुढे जाण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामुळेच माझ्या मनात पत्रकारितेच्या जगात पहिलं पाऊल टाकण्याची हिंमत आली.
माझा पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला चंद्रपुरातल्या ‘दैनिक चंद्रपूर समाचार’मधून. तिथे मी ६०० रुपये पगारावर कार्यालय प्रतिनिधी म्हणून काम करायचो आणि शासकीय कार्यालयांमध्ये वृत्तपत्रं पोहोचवण्याचंही काम करायचो. ती धावपळीची आणि शिकण्याची दिवस होते. त्यानंतर ‘चंद्रधून’ या स्थानिक दैनिकात काम केलं. इथे मात्र पगार दुप्पट झाला होता. बाराशे रुपये!. हळूहळू माझा अनुभव वाढत गेला आणि मला ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून संधी मिळाली. ‘सकाळ’मध्ये काम करताना कृषी, ग्रामीण विकास, सामाजिक मुद्दे, वन आणि पर्यावरण, ऐतिहासिक गोष्टी आणि मनोरंजन अशा विविध विषयांवर मी लिहित गेलो. ‘ॲग्रोवन’ या कृषी दैनिकात माझ्या शेती कथा आणि शोध बातम्या प्रकाशित झाल्या. ‘सकाळ मीडिया ग्रुप’मध्ये मी जवळपास सलग नऊ वर्षं काम केलं.
सकाळमधील माझा प्रवास एका ठिकाणावर थांबला नाही. १ जानेवारी २०१४ ते जून २०१४ या काळात मी कोकणातील अलिबाग येथील ‘कृषीवल’ दैनिकात वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलं. निसर्गरम्य कोकण आणि तिथले साधे, पण लढवय्ये लोक… त्यांचा सहवास खूप काही शिकवून गेला. पण तरीही ‘सकाळ’ची ओढ कायम होती आणि मी पुन्हा ‘सकाळ’मध्ये रुजू झालो. या वेळी मला नागपूर ग्रामीणची जबाबदारी मिळाली. त्या निमित्ताने अनेक गावं फिरण्याची, तिथल्या लोकांच्या समस्या आणि त्यांच्या यशोगाथा जाणून घेण्याची संधी मिळाली. आणि मग २०१४ पासून मी उपराजधानी नागपुरात स्थायिक झालो. ‘दैनिक सकाळ’सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात काम करण्याचा १३ वर्षांचा अनुभव माझ्या पाठीशी होता. चंद्रपूरमध्ये वार्ताहर, उपसंपादक, नागपूर ग्रामीणचा जिल्हा प्रतिनिधी, नागपूर शहर डेस्क इन्चार्ज आणि ‘सकाळ डिजिटल मीडिया’मध्ये मी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. पुढे २०१८ मध्ये नागपुरातील ‘लोकशाही वार्ता’ दैनिकात चीफ रिपोर्टर म्हणून काम केलं. वार्तांकन, संपादन, पानांची मांडणी, जाहिरात डिझाइन आणि वेब डिझाइन यांसारखी अनेक कौशल्ये मी या प्रवासात आत्मसात केली.
चंद्रपुरातील दिवस…
चंद्रपुरात पाऊल ठेवल्यावर स्वप्नांना गवसणी घालण्याची उमेद होती, पण हातात पुरेसा पैसा नव्हता. सकाळच्या कॉलेज आणि दुपारच्या अर्धवेळ नोकरीतून मिळणारे ५०० ते १२०० रुपये म्हणजे गरजांच्या लांबलचक यादीपुढे अगदीच तोकडे. घरभाडे, कॉलेजची फी, तेला-मिठाचा खर्च आणि भाजीपाल्याचा बाजारभाव बघून जीव कासावीस व्हायचा. अशा वेळी मदतीला धावून यायची माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली मित्रमंडळी – संजय भाऊ, दिवाकर भाऊ, प्रकाश आणि अरुण भाऊ. हे सगळेही शिक्षण आणि नोकरीच्या धावपळीत होते.
त्या दिवसात आमचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा – कोणीतरी गावात किंवा आसपास लग्न आहे का, याची बातमी काढायची. मग आम्ही सगळे तयार होऊन लग्नाला जायचो. मंगल अष्टकं झाली की, आमचा मोर्चा थेट भोजनावळीकडे वळायचा. पोटभर जेवण झाल्यावर तृप्त मनाने घरी परत यायचं. हा प्रकार लग्नसराईत अनेकदा चालायचा. पण एकदा, प्रकाश आणि मी दुपारच्या वेळी गुजराथी भवनात जेवणासाठी गेलो आणि तिथे पकडले गेलो. त्या क्षणी आम्हाला खूप अपमानित आणि अपराधी वाटलं. कसंबसं तिथून पळ काढला आणि विठ्ठल मंदिर वॉर्डातील रूमवर पोहोचलो. त्या चुकीचा खूप पश्चात्ताप झाला आणि त्याच क्षणी आम्ही दोघांनी ठरवलं, यापुढे असं काही करायचं नाही.
एकदा रात्री कामावरून घरी यायला खूप उशीर झाला. रूमवर आलो तर तेलाचा डबा रिकामा. रात्री दुकानंही बंद. मग नाइलाजाने गरम भात आणि त्यात तिखट मीठ टाकून पाणी घातलं आणि तेच जेवण म्हणून पोटात ढकललं. ती रात्र कशीतरी काढली. कांदा, तेल आणि तिखट मीठ हे तर आमचं नेहमीचंच भोजन असायचं. कधी कधी तर पारले बिस्किटांवरही रात्र काढली. माझ्या रूमवर अरुण भाऊ पण राहायचा. तो शिकत होता. सकाळी चहासाठी दूध किंवा चहा पावडर नसेल, तर तो नुसती साखर खाऊन कॉलेजला जायचा.
काही दिवसांनी मी रूम बदलली आणि समाधी वॉर्डात नवीन रूम घेतली. तिथे माझ्यासोबत कृष्णा नावाचा गावाकडचा मुलगा शिक्षणासाठी राहायला आला. त्या वेळी मी ‘सकाळ’ वृत्तपत्रात रिपोर्टर म्हणून काम करत होतो आणि माझा पगार अडीच हजार रुपये महिना होता. कृष्णाला एका मेडिकलमध्ये पार्ट-टाइम नोकरी मिळाली. आम्ही दोघे मिळून एका डब्याची मेस लावली होती आणि त्यावर कसेतरी गुजारा करत होतो. अशा परिस्थितीत तो वर्ष कसातरी निघून गेला.
दिवस पुढे सरकत गेले आणि सगळे बंधू-मित्र आपापल्या वाटेने निघून गेले. संजय भाऊ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वाहनचालक म्हणून नोकरीला लागला. दिवाकर भाऊ गावी परतला आणि त्याने दुकान सुरू केलं, पण ते बंद झाल्यावर तो आता बुटीबोरीत नोकरी करतो. अरुण भाऊ आता कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, तर कृष्णा मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
आजही जेव्हा ही मित्रमंडळी भेटतात, तेव्हा त्या जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात. त्या कष्टाच्या दिवसांनी आम्हाला खूप काही शिकवलं. पैशाची किंमत कळली आणि एकोप्याने जगण्याची ताकद मिळाली. चंद्रपुरातील ते दिवस खरंच अविस्मरणीय आहेत.
मुंबईचा पहिला प्रवास…
२००४ ची थंडी. मी बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला होतो. कॉलेज, अभ्यास, मित्र, आणि मधूनच भेटणाऱ्या स्वप्नांची एक वेगळीच दुनिया होती. त्या दिवसांत मित्रांकडून समजलं – वर्ल्ड सोशल फोरम नावाचा एक मोठा कार्यक्रम मुंबईत होतोय! कार्यक्रमाविषयी फारसं माहिती नव्हतं, पण ‘मुंबई’ या दोन अक्षरांनीच मनात वीज चमकली. कारण कार्यक्रमाला जाण्याइतकी ओढ नव्हती, जितकी मुंबई बघायची होती!
चंद्रपूरहून सेवाग्राम रेल्वे पकडली. मनोज, प्रमोद आणि इतर काही मित्र सोबत होते. रेल्वेच्या डब्यात मिळेल त्या कोपऱ्यात आम्ही बसलो. कोणाकडेही तिकीट नव्हतं… पण मनात मुंबईचं तिकीट होतं – स्वप्नांचं, आशेचं, आणि अनुभवांचं!
रात्रभराचा तो प्रवास म्हणजे एक छोटंसं धाडस होतं. वर्ध्याला अजून काही मंडळी चढली. काही गप्पा, थोडं खाणं, आणि बऱ्याच स्वप्नांची देवाण-घेवाण झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई! ठाण्याच्या आसपास आल्यावर त्या उंच इमारती, सिनेमांत बघितलेले फ्लायओव्हर, गर्दी, आणि तो खास मुंबईचा गंध… अगदी मनात घर करून बसला.
मुंबईत पाऊल ठेवलं, आणि क्षणार्धात लक्षात आलं – ही शहरं बघायचीच नसतात, अनुभवायची असतात. पण त्या अनुभवानं सुरुवातीलाच आम्हाला पकडलं! प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासणी सुरू होती. आम्हाला थांबवलं गेलं. गोंधळलो, घाबरलो… पोलिसांनी विचारपूस केली. आम्ही खरं खरं सांगितलं – कार्यक्रमासाठी आलो आहोत, पैसे नाहीत. त्यांनी बॅगा तपासल्या, प्रश्न विचारले. शेवटी आमच्या प्रामाणिक उत्तरांनी त्यांचं मन बदललं, आणि आम्हाला सोडण्यात आलं.
त्या क्षणी वाटलं – मुंबई अंगावर आली.
कार्यक्रमस्थळी पोहोचलो. वर्ल्ड सोशल फोरम, ब्राझीलबाहेर पहिल्यांदाच भारतात – तेही मुंबईत! हे समजल्यावर थोडा अभिमान वाटला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं होतं – आम्ही मुंबईत होतो! रात्र झाली. दादरच्या शिवाजी पार्कजवळ पोहोचलो. झोपायची सोय नव्हती. म्हणून आम्ही तिथेच अंग टाकलं. पण ही मुंबई होती – इथं अंग टाकणाऱ्यांपेक्षा अंगावर घेतणारे जास्त! पोलीस आले. झोपण्यास मनाई केली. मग फुटपाथवर शरण गेलो. पण तिथेही पोलिसांनी उठवलं. मुंबईची पहिली रात्र – भुकेली, थकलेली, आणि तरीही स्वप्नाळू!
दुसऱ्या दिवशी मुंबई बघायची ठरवली. बस दिसली – ५० रुपयात मुंबई दर्शन! आमच्या खिशाला परवडणारी होती. मग सुरू झाला खऱ्या अर्थानं ‘मुंबई दर्शन’ – हाजीअली, गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरीन ड्राइव्ह, कमला नेहरू पार्क… आणि सगळ्यांचं हायलाईट – बसमधून अमिताभ बच्चन यांचा बंगलाही बघितला! एका मित्राकडे कॅमेरा होता. आम्ही फोटो काढले… आणि ते क्षण मनाच्या एलबममध्ये कायमचे जपले.
त्या प्रवासानं आम्हाला मुंबईचं एक रूप दाखवलं. ती स्वप्नांची आहे, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावायची तयारी लागते. ती भव्य आहे, पण त्याहून जास्त व्यस्त आहे. ती देणारी आहे, पण आधी परीक्षा घेणारी आहे.
आज अनेक वेळा मुंबईला गेलो. विमानानं प्रवास केला. हॉटेलात थांबलो, पण तो पहिला प्रवास आजही आठवणीत आहे. न तिकीटाचा, न सोयींचा – तोच सर्वात जवळचा वाटतो. कारण त्यात होती धडपड, भीती, मजा, आणि अनुभवांची खरी सुरुवात.
पहिला विमान प्रवास
माझ्या जीवनातील पहिला विमान प्रवास, २४ नोव्हेंबर २०११—तिथूनच सुरू झाला एक विलक्षण अनुभव. चंद्रपूरच्या एका साध्या सकाळी, मी अजून रिपोर्टर म्हणून काम करत होतो, जेव्हा संपादक श्रीपाद अपराजित सरांचा फोन आला. “देवनाथ, तुला परवा मुंबईला जायचं आहे, आणि ते देखील विमानाने.” माझ्या कानांनी ऐकलं आणि मनात विचार आला, “हे खरं होऊ शकतं का?” मी हसून सरांना म्हटलं, “सर, गंमत करू नका.” पण सरांचे शब्द गंभीर होते, “होय, तुला जायचं आहे. झी एंटरटेन्टमेंट इव्हेन्टच्या निमित्ताने.”
आणि ते खरे होते. रात्र पडल्यानंतर मेलवर तिकीट आलं. २४ नोव्हेंबर रोजी नागपूरहून मुंबईला विमानाने जाऊन पोहोचायचं होतं. अजिबात विचार न करता, मी आदल्या रात्रीच नागपूर गाठलं. हे सर्व नवं होतं. एक वेगळाच आनंद, उत्साह आणि थोडी भीतीही होती. नवीनच असल्यामुळे, सर्व काही थोडं गोंधळलेलं वाटत होतं.
सकाळी, ऑटो रिक्षाने विमानतळ गाठलं. तिथून सुरू झाली माझ्या जीवनातील एक अप्रतिम यात्रा. विमानतळावरचं नवा नवा वातावरण, गोंधळ, आणि एअरलाइनच्या गल्लीगल्ल्यांमधून फिरत असताना एक अनोळखी भय मनात पसरलं. पण, त्याचवेळी गजानन निमदेव, विवेक जोशी, अविनाश पांडे यांसारख्या वरिष्ठ पत्रकार मंडळींची भेट घडली, आणि हळूहळू त्या भीतीच्या पोकळ जागेत विश्रांती मिळायला लागली.
विमानतळावर प्रवाशांची चेकींग होते. रांगेत लागलो. तिथे येणारी प्रत्येक गोष्ट मला नवीन आणि रोमांचक वाटत होती. आम्ही वेटिंग रूममध्ये बसलो. माझं मन उडत होतं. सर्व काही माझ्या मनाच्या मागे एक गती घेऊन वाऱ्यासारखं घोटाळत होतं. विमानाच्या गडबडीत घुसणाऱ्या सर्व आवाजांसोबत एक प्रकारचा भीतीचा धडधड ऐकू येत होता, पण तीही एक रोमांचक भावना होती.
तिथून आम्ही बसमध्ये बसलो, जी आम्हाला विमानापर्यंत घेऊन गेली. विमानाचं दरवाजं उघडलं आणि बसून तिथे जाऊन एक वेगळाच अनुभव मिळाला. सीटवर जाऊन बसलो, आणि उत्सुकतेनं ते पहिलं विमान उडण्याचं मनात सुरू झालं. खिडकीतून खाली बघण्याची, त्या आकाशात आणि उंचावर आकाश कसं दिसते, याची उच्छृंखल अपेक्षा मनात होती.
एअर होस्टेज आल्या. त्यांनी आम्हाला सीट बेल्ट घालण्याचं आणि आपत्कालीन परिस्थितीचं प्रशिक्षण दिलं. मी माझ्या शेजारी बसलेले गजानन निमदेव सर, तरुण भारतचे संपादक होते. त्यांनी विचारलं, “पहिल्यांदा जात आहेस का?” मी धाडसाने हो म्हटलं. तेव्हा सर म्हणाले, “एक काम कर, खिडकीजवळ बस, आणि जे काही फोटो काढायचे असतील ते काढ.”
विमान उडालं. एका हाकेबरोबर विमानाने गती घेतली आणि खाली डोंगर, नद्या, तलाव हळूहळू लहान होऊ लागले. मी खिडकीतून बघत होतो आणि ते दृश्य इतकं मोहक होतं की शब्दांमध्ये व्यक्त करणं शक्यच नव्हतं. दीक्षाभूमी, अंबाझरी तलाव—सर्व दृश्यं एकाच वेळी लहान होऊन आकाशाच्या नीळ्या रंगात समाहित होत होती.
विमान उच्च आकाशात पोहोचलं आणि ढगांच्या घनदाट साम्राज्यात शिरलं. खूप लहान लहान दिसणाऱ्या इमारती, रस्ते, आणि शहरी जीवन हळूहळू लहान होत गेले. आता विमान पुन्हा खूप उंच होतं, जणू जिवंत नकाशावरून सारा प्रदेश ओलांडत होतं.
मुंबईच्या जवळ येताना पर्वत रांगा, वळणं, आणि नदीचं एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. आता मुंबईची वर्दळ दिसू लागली. उंच इमारती, मोठे समुद्र किनारे, समुद्रावर खेळणारी मोठी लाट—विमानाने फेरफटका मारत समुद्रावर थोडा वेळ घालवला आणि नंतर सांताक्रुज विमानतळ कडे पुढे निघालं.
विमान उतरत असताना, एक वेगळा अनुभव झाला—ज्याचं शब्दांत वर्णन करणं कठीण आहे. एक सुखद थंडगार हवा, आणि खाली दिसणारं मुंबईचं शहर, जणू एखाद्या चित्रात रंगवलेलं असं वाटत होतं. आकाशाच्या भव्यतेत माझं छोटंसं अस्तित्व शोधणारा एक प्रवासी. एक नवीन अनुभव, एक नवीन वळण, आणि एक नवीन दिशा… प्रवास सुरु झाला होता.
समुद्रातून कोकणात
१२ वर्ष चंद्रपूरमध्ये नोकरी केली. ती जागा, ती माणसं, आणि तिथलं जगणं- सगळं अंगवळणी पडलं होतं. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक हलकासा थरथरता विचार होता. बदल हवा… काहीतरी वेगळं करायचं होतं. त्या विचाराला दिशा मिळाली, जेव्हा अलिबागच्या “कृषीवल” दैनिकात एक संधी मिळाली. मनात कोकणाबद्दल कायमच एक ओढ होती, पण प्रत्यक्ष तिथे जाण्याचा योग आजवर आला नव्हता. ही संधी त्या ओढीला स्पर्शून गेली.
१० डिसेंबर २०१४. मी अलिबागला पहिल्यांदा निघालो. सोबत होते गोविल आणि बालक हे दोन जिवलग मित्र. घरात मागे होते केवळ सहा महिन्यांची माझी मुलगी आणि पत्नी. तिघींच्या आयुष्यातून मी अचानक बाहेर पडत होतो. निर्णय घेतला होता, पण मनात धुसफूस होती – “ती एकटी कशी सावरून घेईल?” तिला म्हणालो, “आपल्यासाठी आहे सगळं. थोडं कठीण जाईल सुरुवातीला, पण आपलं नक्की जमेल.”
आखिरकार, आम्ही सीएसटी स्टेशनवर पोहोचलो. मुंबईची धावपळ आणि त्यातली गडबड थोड्याशा गोंधळात बदलली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गडबड होती, पण मनातली ओढ तीच होती – गेट वे ऑफ इंडिया आणि पुढे समुद्रात पोहचण्याचा स्वप्नवत अनुभव. सीएसटी स्टेशनवरून आम्ही बेस्ट बस पकडली आणि गेट वे ऑफ इंडियाकडे निघालो. बसमधून मुंबईचा वेगवेगळ्या रंगांचा पैसार दाखवायला लागला. मोठ्या इमारती, रस्त्यावर धावणारे लोक, आकाशात मणिमण्यांसारखे फ्लायओव्हर आणि काचांच्या इमारती! बस थांबली गेट वे ऑफ इंडियाच्या समोर, आणि तिथून पुढे बोटीतून प्रवास सुरु झाला.
वाऱ्याचा हलका स्पर्श, पाण्याचा गोड गंध आणि मनातील उत्साह… गेट वे ऑफ इंडिया सोडल्यावर, समुद्राचा विशाल रकाबाचं स्वागत आमचं केलं. बोटीला निघाल्यावर, मुंबईच्या चकचकीत भागांपासून दूर जाऊन, तिथे एक वेगळंच जीवन उलगडायला लागलं. पण, समुद्रातून आकर्षीत करीत होते ते ताज हॉटेल.
समुद्राचं पाणी इतकं निळं, गडद आणि शांत होतं की त्यात डुबकी घालावं असं वाटत होतं. लाटांशी खेळत, बोटीचं संथ हालणं एक आश्चर्यकारक अनुभव बनलं. एक मृदू, शीतल वाऱ्याची झुळूक, समुद्राच्या सागरकाठावर मऊ-मऊ वाळू… त्या नजरेतून कोकणची वास्तविकता उलगडली. समुद्राच्या पृष्ठभागावर ते हलते-फिरते छोटे-छोटे विमानं किंवा जलचक्रांचं नृत्य पाहताना, त्याचा सौंदर्य एकदम गहिरे होतं. त्या बोटीतून मला एका गोष्टीचं भान आलं. समुद्र खूप मोठा आहे, पण कोकणाच्या किनाऱ्यावरून तो अधिक जवळ येतो. लाटा टाकताना, हवेची गंध आणि हवा किती टवटवीत असते, याचं अनुभव घेणं जणू जिवंत राहण्याची प्रेरणा देत होतं.
समुद्राच्या लाटांमध्ये रेंगाळताना, बोट आली तिथे कोकणाच्या किनाऱ्यालाही एक वेगळाच रंग दिसू लागला. हिरव्या पाश्र्वभूमीवर नारळाच्या बागांची, केळीच्या बागांची आणि इतर फळांच्या झाडांची शरिराच्या गंधाने रंगत होती. कोकण म्हणजे त्याच्या निसर्गाच्या असीम सौंदर्यामुळे जणू एक जादू आहे.
त्या वाऱ्यातून नारळाच्या बागांचा सुगंध पसरला आणि त्या सौम्य पाण्यात बोटीच्या वेगानुसार वाऱ्याची भुर्रकन गती होती. त्या बागांमध्ये हसत खेळत माणसं काम करत होती, आणि समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांची जीवनशैली एकदम साधी आणि आनंदी होती. प्रत्येक घराची भिंत अशीच ताज्या रंगाने रंगवली जात होती, जणू एका नवीन दिवसाची सुरूवात करत असलेली होती.
समुद्रावर लहरी येताना, त्याच लहरींच्या आवाजात एक मृदू संगीत सारखं गुणगुणत होतं. कोकणातील माणसांचं साधं, शांत आणि मेहनतीचं जीवन एक वेगळीच कविता होती, जी समुद्राच्या लाटांवरून वाऱ्याशी गूढ संवाद करत होती. या प्रवासाच्या दरम्यान ते सगळं मांडताना, मला एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव येत होता.
आता मी कोकणात होतो. माणसांचं साधं आणि कष्टाळू जीवन, समृद्ध निसर्ग आणि समुद्राचा नि:शब्द सौंदर्य – हे सगळं त्या बोटीतून गाडल्यानंतर अलिबागच्या किनाऱ्यावर येऊन ठेपलं. समुद्र, नारळांच्या बागा, केळीच्या फुलांच्या नाजुक गंधातून एक नवीन जीवन आणि नवीन सुरूवात दिसत होती. अलिबागला पोहोचलो… तिथे अजून काहीच नवं अनुभवायचं होतं. पण तो पहिला समुद्रमार्गी प्रवास… तिथूनच मी खरी कोकण ओळखली.
अनेक दिवस एकटाच राहिलो. नवीन माणसं, नवीन वातावरण… पण संध्याकाळ झाली की आठवणांची गर्दी जमायची. मग ठरवलं – त्यांना बोलवायचं. माझ्या बायकोला आणि चिमुकलीला. त्या आल्या… मुंबईमार्गे यावं लागतं अलिबागला. ती पहिली भेट होती त्यांची मुंबईशी – बातम्यांत आणि सिनेमांत बघितलेली मुंबई आता समोर होती. स्टेशनवरच्या गर्दीने तिला गडबडवून टाकलं. मी या भागात ६ महिने घालवले होते, त्यामुळे सवय झाली होती, पण तिच्या डोळ्यांत अनोळखीपणाची भीती दिसत होती. लोकलच्या दरवाज्याशी उभं राहणं, उकाड्यात गुदमरायला लावणारी धावपळ… ती थोडी थबकली. पण धीराने, माझ्यावर विश्वास ठेवत पुढे आली.
गेटवे ऑफ इंडिया गाठलं. पुढचा प्रवास समुद्रातून – बोटीनं. हे ऐकताच ती जरा दचकली. “समुद्रातून?” तिच्या आवाजात थरथर होती. पण दुसरा पर्याय नव्हता. वेळेसोबत ती मनाशी तयार झाली… आणि आम्ही निघालो. ती पहिली बोट. सागराची विशालता, लाटांचा थरथराट, आणि त्याचवेळी गच्च हातात धरलेली माझ्या मुलीची बोट – तिच्या डोळ्यांत सगळं स्पष्ट दिसत होतं. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान त्या वाऱ्याच्या झुळुकीनं तिच्या चेहऱ्यावरची काळजी फुलवून टाकली. “हेच का ते कोकण?” ती म्हणाली… आणि मी फक्त हसून मान हलवली. मांडवा बिच गाठला आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला.
महिनाभराचं त्या अलिबागमधलं राहणं… हळूहळू ती रुजली. ओळखी वाढल्या. नव्या मैत्रिणी भेटल्या. घराबाहेर गप्पांची वेळ, नव्या जागेचं आकलन… आणि त्या सगळ्या अनुभवात तिचा आत्मविश्वास वाढत गेला.
एकदा सुट्टी घेतली आणि मुरुड-जंजिराला जायचा निर्णय घेतला. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला ऐतिहासिक किल्ला, त्याचा सागरी दरारा आणि एक छोटासा कौटुंबिक प्रवास – हे सगळं मनात होतं. पण समुद्राची मनःस्थिती काही वेगळीच होती. नाव हलायला लागली, वाऱ्याचा वेग वाढत गेला, आणि लाटा जणू आमच्याकडं आक्रोश करत होत्या. ती घाबरली. मुलगी रडत होती. तिच्या डोळ्यांतला भीतीचा सागर माझ्या मनापर्यंत पोहोचला. “कशाला आणलंत इथं?” असा प्रश्न ती पुन्हा पुन्हा विचारत होती… आणि माझ्याकडे उत्तर नव्हतं. फक्त आश्वासन होतं – “थांब, सगळं ठिक होईल.”
शेवटी नाव सुखरूप किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली. मनातला खळबळता समुद्र शांत झाला. किल्ला, त्याचे तट, ५७२ तोफा – इतिहास जिवंत झाला आमच्यासमोर. झिंगा, सुरमई, कोसंबी – चवीनं मन जिंकलं. त्या दिवशी कळलं, कोकण हे फक्त निसर्गाचं नाव नाही, ते मनातलं ठिकाण आहे. आणि ती व्यक्ती, जिला घेऊन आलो होतो – ती फक्त माझी पत्नी नाही, ती माझा विश्वास आहे.
कोरोनात संधीचं सोने
“संकटं येतात ती संधी घेऊन; फक्त ती पाहण्याचं डोळसपण असावं लागतं.” २०१९ साल. जग अचानक एका अदृश्य शत्रूच्या विळख्यात अडकू लागलं होतं. कोरोना विषाणू. चीनमध्ये सुरू झालेलं संकट काहीच दिवसांत जगभर पसरलं. संपूर्ण मानवजातीचं जीवनचक्रच एका वेगळ्या वाटेवर वळलं. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री रोजच्या जीवनात घट्ट रुळली.
त्या काळात मीही एका वळणावर होतो. काही महिन्यांपूर्वीच माझी नोकरी सोडली होती. करिअरच्या वाटेवरचा हा थांबा जरा लांबला, पण त्याचा अर्थ रिकामपण नव्हता. ऑनलाईन मिळेल ते काम करत होतो, स्वतःच्या स्वप्नांवर काम करत होतो.
मार्च २०२० उजाडला. जगभर कोरोनाची भीती पसरत होती. माझ्या वडिलांची तब्येत अचानक खालावली. मी नागपूरहून गडचिरोलीला निघालो – संपूर्ण कुटुंबासकट. दवाखान्यात गेलो, वडिलांची विचारपूस केली. नर्सेस आता लोकांना रुमाल बांधायला, गर्दी टाळायला सांगू लागल्या होत्या. परिस्थिती तशी शांत, पण काहीतरी मोठं होणार, ही जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. गावाकडे गेलो. कितीतरी दिवसांनी परत आलो होतो. गावाचं शांत वातावरण, मातीचा गंध आणि आपुलकीनं भरलेली माणसं, हे सगळं मनाला वेगळाच दिलासा देत होतं. दोन दिवस तिथे मुक्काम ठरला. पण नियतीला काही वेगळंच ठरवायचं होतं.
त्या दिवशी भारताने स्वेच्छेने पहिलं पाऊल उचललं. रस्ते ओस पडले, व्यवहार थांबले. आणि दुसऱ्याच दिवशी, २४ मार्चला, पंतप्रधानांनी देशव्यापी २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केला. गावात अडकलो. नागपूर परतणं अशक्य झालं. पण त्यातही एक हळूहळू वेगळी जाणीव उमटू लागली. वेळेचा भरपूर साठा आणि कुटुंबाचा पूर्ण सहवास. शहरातल्या धावपळीच्या जीवनात जो हरवलेला संवाद होता, तो इथे गावात, लॉकडाऊनच्या काळात हळूहळू जागा घेऊ लागला.
घरात बसून राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण घरात ‘कोंडून’ न राहता आम्ही ‘एकत्र’ राहू लागलो. उन्हाळ्याचे दिवस होते. वीज अपुरी, इंटरनेट अपुरं. मोबाईल आणि टीव्हीला मर्यादा आल्या. मग घरातल्या घरात सुरू झाला एक खास कार्यक्रम “चौवाअष्टा”.
हा पारंपरिक खेळ. आमच्या झाडीपट्टीतील लोकांचा लाडका. चार गोठ्या, चिंचोके, आणि आठ आठ चौकटींचा तक्ता – एक साधं माध्यम, पण भावनिक बंध जुळवण्याचं प्रभावी साधन. हास्य, चेष्टा, भांडणं, आणि पुन्हा एकत्र येणं – या खेळात सगळं सामावलं.
कोरोनाचं संकट संधी ठरलं होतं. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात जे हरवलेलं होतं. ते सगळं आम्ही शोधू लागलो. एकमेकांच्या कथा, आठवणी, गावकुसाबाहेर गेलेल्या गोष्टी पुन्हा उगम पावत होत्या. गावाकडे इतके दिवस सलग राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तब्बल १८ वर्षांनंतर.
लॉकडाऊन संपेल, आपण परतू, हे वाटत होतं. पण पंतप्रधानांचं भाषण पुन्हा एकदा घरातल्या टीव्हीवर घुमलं आणि पुढच्या लॉकडाऊनची घोषणा झाली. परतीचा रस्ता पुन्हा लांबला. पण त्या क्षणी माझ्या मनात एक विचार नकळत उमटला. “कधी काळी जे आपल्याकडे होतं, ते आपण हरवून बसलो होतो. आणि कोरोनाच्या या संकटानं आपल्याला ते पुन्हा दिलं – थोड्या वेगळ्या स्वरूपात. हीच संधी होती – एकत्र येण्याची, स्वतःला शोधण्याची, आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याची.”
कोरोना आला, गेला. पण तो मागे एक शिकवण ठेवून गेला. संकटं हाती येतील, पण त्यातच संधीचं सोनं दडलेलं असतं. त्यासाठी डोळे उघडे ठेवायला हवेत. आणि मन उबदार.
लॉकडाऊन टर्निंग पॉईंट
आता सगळं थांबलेलं होतं. रस्ते ओस पडले होते. लोकांनी दारं बंद केली होती. आणि आयुष्य… आयुष्य एका अनाम भीतीच्या कुशीत अडकून पडलं होतं.
कडक लॉकडाऊन सुरु झाला होता. अशा वेळी, काही जण माझ्याकडे वेबसाईट, डिजाईन, सोशल मीडियासारख्या कामांसाठी विचारणा करत होते. पण हाताशी काहीच नव्हतं – ना संगणक, ना लॅपटॉप, ना इंटरनेट. तेव्हा आठवलं.. माझ्या चुलतभावाकडे, नितीनकडे, निफंद्रा गावात त्याच्या दुकानात एक जुना कंप्युटर पडून होता. जोखमीचा मार्ग होता. पण निर्णय घेतला. जंगल मार्गाने, श्वास रोखून आम्ही निफंद्रा गाठलं. हातात काळजीपूर्वक तो जुना कंप्युटर घेतला आणि परत आलो.
पण… कधी-कधी साधनं असली, तरी उपयोग होत नाही. साफ्टवेअर अपडेट नव्हती, इंटरनेट कनेक्शनही घेत नव्हतं. तो संगणक चालला, पण माझं स्वप्न त्यावर चाललंच नाही. तेव्हा मोबाईल हाच हातातला एकमेव शस्त्र बनला. त्याच्यावर बातम्या टाईप केल्या, पोस्ट डिझाईन केल्या, सोशल मीडियावर क्लायंटसाठी कामं करीत राहिलो.
एक दिवस चंद्रपूरहून मित्राचा फोन आला. “वेबसाईटमध्ये काही अपडेट करायचं आहे.” मी स्पष्ट सांगितलं – “लॅपटॉप नाही, म्हणून शक्य नाही.”
त्यांना ते मान्य नव्हतं. माझ्या कामावर, माझ्यावर त्यांचा विश्वास होता. मग काय – राजूभाऊ, संजय आणि रोहित या तिघांनी कडक लॉकडाऊनमध्ये बाईकवरून चक्क माझ्या गावी मेहापर्यंत यायचं ठरवलं. ते पोहोचले. रोहितचा लॅपटॉप होता. त्यांनी मला तो एक महिना वापरायला दिला. त्या लॅपटॉपबरोबर माझ्या संधींचाही “पॉवर बटन” ऑन झाला. माझं काम पुन्हा गती पकडू लागलं. वेबसाईटचे ऑर्डर येऊ लागल्या. अॅडव्हान्स पेमेंटही मिळू लागलं. मी पुन्हा नव्या जोमाने डिझाईनला सुरुवात केली. घरासमोरच जिओ टॉवर. नेटवर्कचं भरपूर स्पीड. लोक म्हणतात, संकट काळ आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख करून. माझ्यासाठी लॉकडाऊन एक टर्निंग पॉईंट ठरला. जेव्हा अनेक IT कंपन्यांची दारं बंद होती, तेव्हा मी माझा “स्मॉल बिझनेस” सुरू केला.
मी स्वतःच्या हिमतीवर, मित्रांच्या विश्वासावर आणि एका जुन्या लॅपटॉपच्या मदतीनं “शून्यातून सुरूवात” करून, स्वप्नाला वळणं दिली. लॅपटॉप मिळाल्यानंतर सगळं काही हळूहळू आकार घेऊ लागलं. वेबसाईटचं डिझाईन पुन्हा सुरु झालं. काही दिवसांतच कामं मिळू लागली.
सुरुवातीचे क्लायंट्स ओळखीचेच होते. मी पत्रकारितेत बरीच वर्ष होतो. त्याच ओळखीचा फायदा झाला. याच काळात वृत्तपत्र गावात, शहरात पोहोचत नव्हती. त्यामुळं बातम्या पोहोचत नव्हत्या. लॉकडाऊनमुळे वर्तमानपत्राची छपाई थांबली होती आणि फक्त वेबसाईट आणि पेपर अपडेट केले जात होते. कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात करण्यात आली होती. पत्रकार मंडळी संकटात सापडली होती. अनेक पत्रकार मित्र पोर्टल सुरु करण्याच्या मानसिकेत आले. त्यांच्यातला पत्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. भाऊ, तुमचं काम बघितलंय, वेबसाईट हवी आहे आम्हालाही. पण, जास्त खर्च करू शकत नाहीत. मी त्यांच्या गरजा समजून घेतल्या. फक्त कुणाला तीन हजार रुपयात, काहींना ४ हजारात वेबसाईट बनवून दिली. पैसे कमविणे हा माझा उद्देश नव्हता, तर लोकांच्या गरजा, भविष्यातील बिझनेस डोळ्यासमोर ठेवून मी अत्यंत माफक दरात स्टार्टअप केलं. एकेक प्रोजेक्ट हातात घेतला आणि मन लावून पूर्ण केला. त्यांनी माझं काम पाहिलं, आणि मग तेच लोक इतरांना सांगू लागले. माऊथ पब्लिसिटी सुरू झाली. पण हे सगळं करताना एक गोष्ट महत्त्वाची होती. मी ऑफिस घरातूनच चालवत होतो.
घरातल्या एका कोपऱ्यात मी टेबल ठेवलं. त्यावर लॅपटॉप, एक वही, काही पेन.
सकाळी लवकर उठून ईमेल्स तपासत होतो, दुपारी क्लायंट कॉल्स, आणि रात्री उशिरापर्यंत डिझाईन फाईल्स तयार करत बसायचो.
अनेकदा लाईट जायचा, इंटरनेट जायचं, कधी लॅपटॉप हँग व्हायचा – पण काम थांबत नसे. कारण आता हे फक्त काम नव्हतं – ही माझी ओळख होती.
एका प्रोजेक्टच्या यशानंतर दुसरा क्लायंट मिळत होता. माझ्या कामात स्पष्टता, वेळेचं भान आणि माणुसकी होती. म्हणून लोक जोडले गेले.
“तुम्ही वेळेवर दिलं, एकदम व्यवस्थित केलं, हे ऐकणं हीच माझी कमाई होती.
माझं छोटंसं ऑफिस आता अनेकांचं विश्वासाचं ठिकाण बनलं होतं.
एक दिवस असा आला…
एका मोठ्या क्लायंटचा फोन आला.
त्यांनी माझ्या डिजाईनची सरळ प्रशंसा केली.
“तुम्ही कुठल्या कंपनीत काम करता?”
मी हसलो आणि म्हटलं –
“मी कंपनी नाही. मी घराच्या एका कोपऱ्यात बसून स्वतःची छोटी वाट चालतो आहे.
ते क्षण अनमोल होते.
कारण एक गोष्ट मी त्या दिवशी समजून घेतली –
“आपण कुठे आहोत, यापेक्षा आपण काय बनवतो, ते महत्त्वाचं.”
यशाच्या वाटेवर चालताना अनेकदा वाटतं की,
“आपण सगळं बरोबर करत आहोत.”
पण प्रत्यक्षात, चुका हेच सर्वात मोठं शिक्षण देतात.
मी लॅपटॉपवर काम करत होतो, क्लायंट्स ऑनलाईन येत होते, काम हातात होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं… असं वाटत असतानाच, पहिलं मोठं चॅलेंज आलं. माझ्या १० वेबसाईट हॅक झाल्या. मी पुढील होस्टिंग कंपनीशी संपर्क साधत होतो. त्यांनी हात वर केलं. यात आमचा काही दोष नाही, तुमचं तुम्ही बघा! मी गोंधळात सापडलो. क्लायंटचे फोन येऊ लागले. वेबसाईट बंद आहेत. लवकर सुरु करा. तुम्हची सर्व्हिस नीट नाही. ओरड ऐकून घेतली. आता पुढे मार्ग नव्हता. मलाही पाहिजे तसा टेक्निकल नॉलेज नव्हता. मला काही सुचत नव्हतं. नागपूरला एका आयटी कंपनीच्या मित्रांसोबत ओळख होती. अभिजित त्यांच नाव. त्यांना कॉल केला. त्यांची मदत मागितली. त्यांच्या सल्ल्यानुसार नवीन होस्टिंग घेतली. सर्व वेबसाईट ट्रान्स्फर केल्या. नव्यानं सुरुवात झाली.
एका नव्या क्लायंटची वेबसाईट डिझाईन केली. माझ्या मते ती खूप सुंदर झाली होती. कलर स्कीम, फॉन्ट्स, लेआउट… सर्व काही मस्त.
मी त्यांना डेमो पाठवला. पण त्यांच्या प्रतिक्रिया होत्या थोड्याशा थंड. “हे मला हवं होतं असं नाही दिसत…” तेव्हा कळलं – मी डिझाईन केलं होतं “माझ्या डोक्यातली” वेबसाईट, त्यांच्या गरजांची नाही. म्हणजे काय? मी आधी त्यांच्या डिटेल्स, त्यांच्या कल्पना व्यवस्थित समजून घेतल्या नव्हत्या. प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी, क्लायंटच्या अपेक्षा स्पष्टपणे समजून घेणं, हे कळलं.
एकवेळ अशी आली की दोन-तीन प्रोजेक्ट्स एकत्र आले. मी उत्साहात सगळं स्वीकारलं. कारण वाटलं, “सगळं जमवता येईल.”
पण तसं झालं नाही. एक प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नाही. क्लायंट नाराज झाला. त्याला वाटलं, मी वेळ घेऊनही गंभीरपणे काम केलं नाही. ओव्हर-कॉन्फिडन्स मला नडला.
एकदा एका वेबसाईटवर थेट सर्व्हरवर काम करत होतो. थोडंसं कोड बदलायचं होतं – पण एक छोटी चूक केली, आणि सगळी वेबसाईट डाउन झाली. माझं काळीजच धडधडलं. रात्रभर गुगल, युट्यूब, कोड फोरमवर डोळे लावून बसलो. शेवटी चूक सापडली, आणि वेबसाइट परत चालू झाली. पण ती रात्र आजही लक्षात आहे.
एक दिवस, मनोज मित्राचा फोन आला.
“भाऊ, एक न्यूज पोर्टल बनवून द्या. पण, मला हवी तशी डिझाईन हवी आहे.”
मी विचार केला – “न्यूज पोर्टल! ही एक मोठी गोष्ट आहे. पण त्याचवेळी, कधीच न सुटलेली ‘गावाकडे असण्याची’ समस्या होती. गावात लॅपटॉपवर काम करणं शक्य असलं तरी, प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक ठराविक डेडलाइन आणि ओळखीचं वातावरण आवश्यक होतं.
म्हणूनच, मी मनोजला सांगितलं – “पण मी गावात आहे, तिथून काम कसं करणार? काही साधनं अजून नाहीत.”
मनोज म्हणाला, कोणतीही चिंता नाही! मी कारने येतो. तू निश्चिंत राहा.
हा प्रस्ताव स्वीकारून, त्याचवेळी मी आणि कुटुंबाने चंद्रपूरला जाण्याचा निर्णय घेतला.
याचा अर्थ होता एक मोठं पाऊल – गावाहून चंद्रपूरमध्ये स्थायिक होणं, आणि तिथून काम करणं.
मनोज सोबत बसून काम करणं खूपच संवादी आणि गतीशील होतं. वेबसाईट पूर्ण झाली. मनोज खुश झाला. आणि त्यानंतर एक मोठा टर्निंग पॉइंट आला.
“पुन्हा एकदा, मी त्या प्रोजेक्टवरून पैसे कमावले, आणि तोच पैसा वापरून लॅपटॉप घेण्याचा विचार केला.”
रोहितने दिलेल्या लॅपटॉपमुळे मी खूप सहाय्य घेतलं होतं. पण आता, स्वतःचा लॅपटॉप मिळवून, स्वत:च्या जोमाने काम करण्याचा आदर्श ठरला.
त्याच लॅपटॉपमुळे मी चंद्रपूरमध्ये राहून वेबसाईट्स तयार करायला सुरुवात केली.
डिजिटल मीडियाकडे प्रवास
२०१९ मध्ये मी पत्रकारितेतील नोकरी सोडली आणि आणि ‘स्मित डिजिटल मीडिया’ची स्थापना केली. पत्रकारितेच्या या प्रवासात माहिती आणि तंत्रज्ञानाचं महत्त्व मला जाणवलं. २०२२ मध्ये नागपुरातील एका आयटी कंपनीच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरपालिकेत ‘कंटेंट एक्सपर्ट’ म्हणून काम करण्याचा अनुभव घेतला. नागपुरातील ‘द पी.आर. टाईम्स’ आणि ‘टेक्नोव्हिजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन’ या कंपन्यांमध्ये फ्रीलान्सर म्हणून कंटेंट रायटर सेवा दिली. यासोबतच विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचा माध्यम आणि डिजिटल सल्लागार म्हणूनही काम बघितलं
आणि त्यानंतर ‘डिजिटल साक्षरता’ हा विषय घेऊन पत्रकारितेतील लोकांना माहिती आणि तंत्रज्ञानाचे धडे देण्यास सुरुवात केली. यासाठी मी राज्यभरात अनेक डिजिटल कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांमध्ये मी पत्रकारांना डिजिटल मीडियाचं महत्त्व, त्याचे विविध प्रकार, त्याचा वापर करताना घ्यायची काळजी आणि डिजिटल माध्यमातून बातम्या कशा लिहाव्यात व प्रसारित कराव्यात, याबद्दल मार्गदर्शन केलं. आज मी अनेक ठिकाणी सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया यावर मार्गदर्शन करतो. ऑनलाईन वेबिनार आणि कार्यशाळांच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता वाढवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या या कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे, जे मला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देतं.
२०२३ मध्ये माझं “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात मी डिजिटल मीडियाच्या संधीविषयी माहिती दिली आहे. अवघ्या तीन महिन्यांत या पुस्तकाच्या आठशे प्रती विकल्या गेल्या, जो माझ्यासाठी खूप मोठा आनंद होता. वेबसाईट डिझाइनचं कौशल्य आत्मसात करून मी आजपर्यंत तिनशेहून अधिक न्यूज पोर्टल्स डिझाइन केल्या आहेत. माझं हे काम डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण आहे, असं मला अनेकजण सांगतात, तेव्हा खूप बरं वाटतं. ब्लॉग डिझाइन, काव्य लेखन, चित्रकला आणि काव्यविडंबन हे माझे आवडते छंद आहेत, जे मला माझ्या कामातून उसंत मिळाल्यावर आनंद देतात.
या संपूर्ण प्रवासात मला रामदासजी रायपुरे, चंद्रगुप्त रायपुरे, गजानन जानभोर, श्रीपाद अपराजित, देवेंद्र गावंडे, शैलेश पांडे, सुनील कुहीकर, भूपेंद्र गणवीर, प्रमोद काळबांडे, भास्कर लोंढे, आनंद आंबेकर, संजय तुमराम, प्रमोद काकडे आणि स्व. गजानन ताजने यांसारख्या अनेक अनुभवी पत्रकारांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच मी आज पत्रकारितेच्या नव्या युगात आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे आणि नवनवीन गोष्टी शिकण्याचा माझा प्रयत्न आजही सुरू आहे.
- देवनाथ गंडाटे