नमस्कार माझं नाव नीलम रवी जाधव. मी भिवंडीला राहते. रमी सर्कलबद्दल मला माझ्या भावाकडून समजलं. मग मी रमी सर्कलवर गेम खेळायला लागले. कधी वेळ असेल तर खेळते नाहीतर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी खेळते. मी शनिवारची टूर्नामेंट जिंकले. माझ्यासारखे तुम्ही पण रमी सर्कलवर गेम खेळा आणि पैसे जिंका, अशी जाहिरात तुम्ही बघितली असलाच. चित्रपटातील अनेक कलावंतदेखील ऑनलाईन गेमविषयी जाहिराती करतात. त्यांचे आकर्षण असल्याने सामान्य जनता लखपती होण्याच्या नादात पैसे, वेळ, निराशा पदरी येते. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना हेही माहीत नसतं की तो बोनस रमी गेम शोवाले पुन्हा काही काळानंतर रिटर्न करतात. ती रक्कम आपल्या बँक खात्यात येत नाही. लोकांना वाटतं मला दीड हजार बोनस मिळाला म्हणजे मी तो बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतो. पण तसं होत नाही. त्या बोनसवर तुम्हाला रमी खेळता येते का? तर तसंही नाही. जोपर्यंत तुम्ही रियल कॅश तुमच्या वॉलेटमध्ये गुंतवत नाही तोवर तुम्हाला गेम खेळता येत नाही आणि इथूनच तुमच्या फसवणूकीला सुरवात होते.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण विरंगुळा म्हणून ऑनलाइन गेम्स खेळतात. या सवयीमुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही एक वेगळी आरोग्याची समस्या असताना मोठी माणसं पैसे कमविण्यासाठी ऑनलाइन गेम्स खेळू लागली आहेत. मागील काही वर्षात पैशांशी निगडित असलेल्या ऑनलाइन गेमचे अनेकांना व्यसन जडले आहे. त्वरित आर्थिक लाभ मिळण्याच्या लालसेपोटी लोक स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेत आहेत. हे व्यसन केवळ तरुणांमध्येच नाही तर सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्येही दिसून येते. प्रारंभी अशा ॲपच्या माध्यमातून गेम खेळून तुम्ही पैसे कमवू शकता, ऑफर आणि जाहिरातींचा नियमित लाभ घ्या, मित्रांसह ॲप शेअर करून बोनस मिळवा, स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंका, कॅशबॅक आणि बक्षिसे मिळविण्यासाठी विविध क्रिया करा, अशी आमिषे दाखविली जातात.
ऑनलाईन पैसे कमविणे हा एक जुगार आहे. या जुगारात खेळणारा कधीही श्रीमंत होत नाही. सुरूवातीला बिगिनर्स लक म्हणून काही डाव आपल्याला जिंकू दिले जातात. तुम्हाला भरोसा आला की आपणाला पैसे मिळतात पण जात मात्र नाहीत. तेव्हा तुम्ही हा जुगार रोज खेळण्यास सुरुवात करता. आणि त्याच्या बरोबर खिशातले पैसेही जात असतात. गेममध्ये हारलेले पैसे आज ना उद्या पैसे परत मिळवता येतील, या आशेने लोक खेळत राहताता आणि शेवटी खिशा रिकामा होतो. एकदा ही सवय लागली की मग आधीन झालेला व्यक्ती खेळायला पैसे नसले तर मित्राकडून नातेवाइकांकडून खोटे बोलून पैसे घेतो. उधारी, कर्ज काढून फसलेले पैसे काढण्यासाठी पुन्हा खेळू लागतो. पण, शेवटी निराशा येते, ही वस्तुस्थिती आहे.
यात फसगत झाल्यावर अस्वस्थ आणि चिडचिडेपणा जाणवणे, वास्तविक जगातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी मार्ग शोधणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम, आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात आणि अशावेळी नैराश्येपोटी जीवन संपविण्याचा विचार मनात करणे, आदी घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे अशा गेमच्या नादी लागून पैसे कमविण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा डिजिटल माध्यमाचा चांगला वापर करून कमाईचे नवे साधने शोधावीत.