Google

गुगलने बदलला तंत्रज्ञानातील जीवन

डिजिटल युगामध्ये कोणतीही माहिती शोधायची असेल, तर सर्वात जास्त गुगलचा वापर होतो. गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोक इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात. एवढे प्रचंड वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनला ब्लॉग किंवा वेबसाईट जोडावीच लागते. भारतातल्या सर्व वेबसाईटचा मुख्य ट्रॅफिक श्रोत गुगल आहे. आज गुगलचा वापर फक्त शोधण्यापुरताच मर्यादित नसून, बहुद्देशीय व्यासपीठ ठरले आहे. ईमेल, नकाशे आणि नेव्हिगेशन, क्लाउड स्टोरेज, फोटो आणि व्हिडिओ स्टोरेज आणि शेअरिंग, व्हिडिओसाठी युट्युब, अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम, वेब ब्राउझर, भाषांतरण, लेन्स, गुगल प्लेस्टोअर, यासह सुमारे ३० सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ज्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडत आहेत.

1996 मध्ये, स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी “बॅकरब” नावाचा एक नवीन शोध इंजिन विकसित करण्यास सुरुवात केली. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन अशी त्यांची नावे. हा प्रकल्प त्यांच्या पीएच.डी प्रबंधाचा भाग होता. इंटरनेटवरील माहिती अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि शोधण्यायोग्य बनवणे असा त्यांचा उद्देश होता.

बॅकरब वेबसाइट्समध्ये बॅकलिंकचा वापर होत असल्याने इतर वेबसाइट्स त्याच्याशी कनेक्ट होत असत. यामुळे सर्च इंजिन म्हणून ते विकसित झाले. 1998 मध्ये, त्यांनी गुगोल नावावरून प्रेरणा घेऊन कंपनीचे नाव बदलून गुगल असे केले. पुढल्या काळात इतर शोध इंजिनांपेक्षा अधिक अचूक आणि कार्यक्षम बनला. गुगलने वेब क्रॉलिंग आणि अल्गोरिदम सुधारण्यात गुंतवणूक केली, ज्यामुळे त्यांना सर्च इंजिन अधिक प्रभावी बनवण्यास मदत झाली. म्हणूनच आज गुगल हे जगातील सर्वात लोकप्रिय शोध इंजिन आहे. जगभरातील लोकांना माहिती पुरविणारा आणि जगण्याचा मार्ग बदलत आहे. गुगलच्या विविध सेवांनी जगभरातील सामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे. माहिती मिळवणे, संपर्कात राहणे आणि अपडेट असणे यासह अनेक क्षेत्रांमध्ये लोकांना मदत करून, अनेकांच्या जीवनाची गुणवत्ताच सुधारली आहे. आज गुगल जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या प्रांतिक गरजेनुसार माहिती शोधणे सोपे होते.
जीमेल हे जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा आहे, जी लोकांना जगभरातील इतर लोकांशी त्वरित आणि सहजपणे संवाद साधण्यास मदत करते. इतर सेवांमध्ये गुगल मीट जे लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, त्वरित संदेशन आणि व्हॉईस कॉलिंगद्वारे वास्तविक वेळेत संवाद साधण्यास मदत करतात. याशिवाय युट्युब हे देखील व्हिडीओ स्वरूपात सर्वात जास्त वापरले जाणारे व्यासपिठ ठरले आहे. गुगल ड्राइव्ह हे एक क्लाउड स्टोरेज आहे. या माध्यमातून फाइल्स सुरक्षितपणे साठवण्यास आणि इतरांसह पाठविण्यास मदत करते.दस्तऐवज, स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन्स तयार करण्यासाठी देखील गुगलच्या सेवा आहेत. वेळेचे नियोजन करण्यासाठी कॅलेंडर, दुसऱ्या भाषेतील मजकूर भाषांतरित करणे, नव्या शहरात गेल्यावर स्थळ शोधण्यासाठी मॅपचा वापर होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights