२०२० मध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. लोक घरात बंदिस्त झाली होती. अशावेळी टीव्ही आणि मोबाईलशिवाय इतर कोणतीही मनोरंजनाची साधने नव्हती. आऊटडोअर गेम, कार्यक्रमावर बंदी आली. अशावेळी घरात कोंडून बसलेल्या लोकांना सोशल मीडियाशिवाय पर्याय नव्हता. मग, घरातल्या घरात अनेकांनी आपल्या कलागुणांना प्रदर्शित करणे सुरु केले. इतकेच नव्हेतर त्याचे छोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड केले. लोकांनी पसंती दिली आणि अनेकजण सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून स्टार झालेत.
आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया हे केवळ मित्र आणि कुटुंबियांसोबत संपर्कात राहण्याचे माध्यम नाही तर ते कला प्रदर्शनाचे नवीन क्षितिज बनले आहे. टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब (TikTok, Instagram, YouTube) सारख्या प्लॅटफॉर्मवरून अनेक कलाकार आपली कला जगाला दाखवत आहेत आणि प्रसिद्धी मिळवत आहेत. भारतीय लोक दररोज सरासरी २-३ तास सोशल मीडियावर घालवतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे ‘इन्फ्लुएंसर’ यांना लाखो रुपये कमाईची संधी मिळत आहे. भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ७६% लोक दररोज सोशल मीडिया वापरतात. प्रत्येक व्यक्ती सरासरी ४ तास सोशल मीडियावर घालवते. तरुणांमध्ये इंस्टाग्राम आणि TikTok सर्वाधिक लोकप्रिय आहेत, तर फेसबुक आणि यूट्यूब सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
२०१७-१८ मध्ये टिकटॉक नावाचे एप प्रचंड लोकप्रिय होते, ज्याने जगभर धुमाकूळ घातला. लहान आणि मनोरंजक व्हिडिओसाठी ते प्रसिद्ध आहे. अनेक कलाकार या प्लॅटफॉर्मवर नृत्य, गाणे, विनोद, कलाकृती आणि इतर अनेक प्रकारची कला सादर करतात. टिकटॉकमुळे अनेक नवीन कलाकार प्रसिद्धीच्या क्षितिजावर आले आणि त्यांना मोठ्या संख्येने चाहते मिळाले. पण, दुरुपयोग होऊ लागलं. टिकटॉक ॲपवर २०२० मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतांमुळे बंदी घातली. त्यानंतर भारतीय बनावटीची अनेक ऍप आलीत. पण, स्पर्धेत टिकून राहू शकल्या नाहीत. परंतु, शॉर्ट व्हिडीओचा वेड लागलेल्या तरुणानी इंस्टाग्रामला जवळ केले. इंस्टाग्राम हे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी प्रसिद्ध आहे.मग, फेसबुकवरूनही रिल्स अपलोड करण्याची सुविधा मिळाली. गेल्या वर्षात लांब आणि विस्तृत व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबनेही शॉर्ट व्हिडीओ या पर्याय खुला केला.
रील्स हा वापरकर्त्यांना त्यांची कला व्यक्त करण्याचा आणि नवीन कल्पनांचा प्रयोग करण्याचा एक सोपा मार्ग आहे. अनेकजण नृत्य, कॉमेडी, कला, शिक्षण, आणि प्रेरणादायी व्हिडिओ तयार करतात. तरुणांना नवीनतम ट्रेंड आणि आव्हानांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. लाखो फॉलोअर्स झाले की आर्थिक कमाई करता येते. अनेक व्यवसाय आणि ब्रँड रील्सचा वापर ग्राहकांशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी करत आहेत. अनेक रील्स सामाजिक समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वापरल्या जात आहेत.
रील्स हा तरुणांमध्ये एक लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम बनला आहे, जो कला, मनोरंजन आणि सामाजिक जागृतीला प्रोत्साहन देतो. रील्सचा प्रभाव अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे आणि भविष्यातही तो वाढत राहण्याची शक्यता आहे. इन्फ्लुएंसर बनण्यासाठी क्रिएटिव आणि एंगेजिंग कंटेंट तयार करण्याची क्षमता आणि सोशल मीडिया ट्रेंडचा चांगल्या प्रकारे अभ्यास करणे आवश्यक आहे.